नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला आज गुरुवारी सलग तिसर्या दिवशी कर्मचार्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. याचा देशभरातील विमान कंपनीच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळांवर २०० उड्डाणे रद्द करण्यात आल्याने विमानतळाची स्थिती रेल्वे स्टेशनसारखी झाली. त्यामुळे लेकरा बाळांना घेऊन विमानतळावर बसण्याची वेळ प्रवाशांवर आली.
४८ तास लागणार....
गेले दोन दिवसापासून विमानतळावर जी समस्या उदभवली. पायलट ड्युटीचा तसेच कम्प्युटर स्वाप्टवेअरच्या समस्या होत्या. त्यात दुरुस्ती करण्यासाठी अजून ४८ तास लागणार असे इंडीगोने सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवस प्रवाशांना त्रास झाला. विमानतळावर रात्री प्रवाशांना थांबावे लागले. असे नागरिक उडाण समितीचे अध्यक्ष सुनित कोठारी यांनी स्पष्ट केले.
अनेक प्रवाशांची रात्र विमानतळावर
आज सकाळी दिल्लीहून निघालेल्या इंडिगोच्या ३० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. सकाळपासूनच दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या, अनेक प्रवाशांनी संपूर्ण रात्र त्यांच्या उड्डाणांच्या प्रतीक्षेत घालवली. हैदराबादमध्येही सुमारे ३३ उड्डाणे रद्द करण्यात आली. आज देशभरात इंडिगोच्या १७० हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, मंगळवार आणि बुधवारी इंडिगोच्या जवळपास २०० उड्डाणे रद्द करण्यात आली होती. बेंगळुरूमध्ये ४२, दिल्लीत ३८, मुंबईहून ३३, हैदराबादमध्ये १९, अहमदाबादमध्ये २५, इंदूरमध्ये ११, कोलकातामध्ये १० आणि सुरतमध्ये ८ उड्डाणे रद्द करण्यात आली होती. शेकडो उड्डाणे तासन्तास उशिराने झाली. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक प्रवासी अडकून पडले. इंडिगो एअरलाइन्स दररोज सुमारे २,३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. कंपनीने बुधवारी प्रवाशांची माफी मागितली आणि शुक्रवारपर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
इंडिगोने म्हटले, ५ डिसेंबरपर्यंत परिस्थिती सामान्य होईल
बुधवारी दिलेल्या निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की किरकोळ तांत्रिक बिघाड, हिवाळ्यातील वेळापत्रकात बदल, खराब हवामान, मंद विमान वाहतूक नेटवर्क आणि क्रू शिफ्ट चार्ट (फ्लाइट ड्युटी टाइम मर्यादा) शी संबंधित नवीन नियमांचे पालन यामुळे त्यांच्या ऑपरेशन्सवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. हे आधीच सांगणे शक्य नव्हते. कंपनीने म्हटले आहे की पुढील ४८ तासांत ऑपरेशन्स स्थिर होतील.
डीजीसीएकडून इंडिगोला समन्स
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोला सध्याच्या समस्यांची कारणे आणि त्या सोडवण्याच्या योजनांबद्दल तपशील मागितले आहेत. डीजीसीएने म्हटले आहे की ते या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि उड्डाण रद्द करणे आणि विलंब कमी करण्याचे मार्ग मूल्यांकन करत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मते, क्रूची कमतरता हे प्राथमिक कारण आहे. गेल्या महिन्यापासून इंडिगोला या समस्येचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबरमध्ये १,२३२ उड्डाणे रद्द करण्यात आली. मंगळवारी १,४०० उड्डाणे उशिराने सुरू झाली.